Thursday, May 30, 2013

तो ऎकतच नाही, सारखा कार्टून पाहायचं म्हणून हट्ट धरून बसतो

लहान मुलगा बोलालया लागला, तो शिनचॅन सारखाच बोलतो, वागतो म्हणून पहिल्यांदा जेव्हा त्याचं कौतूक होतं तेव्हाच खरंतर धोक्याची घंटा वाजलेली असते. पण आपण त्याच्या कौतुकात एवढे रममाण होतो की पुढे काय वाढून ठेवलय त्याची आपणाला तेव्हा कल्पनासुद्धा येत नाही. लहानगा टीव्हीसमोर बसल्याने, आपल्याला आपली कामं करता येतात, शांतपणे झोपता येतं म्हणून त्याची आईही खुश असते. तो मोठा होत जातो तशा तक्रारी सुरू होतात. “तो ऎकतच नाही, सारखा कार्टून पाहायचं म्हणून हट्ट धरून बसतो.” थोड्या दिवसानी तो शाळेत जावू लागतो. कार्टूनची समस्या आणखीनच उग्र होते. शाळेतून आल्या आल्या टीव्हीसमोर बसूनच खाणं पिणं चाललेलं असतं. घरच्यांचं कौतूक चालूच आसतं. मुलगा किंवा मुलगी जात्याच हुशार असल्याने अभ्यासात पहिली असतात. पण ती जस जशी पुढच्या वर्गात जातात तस तशी ती अभ्यासात मागे पडत जातात. मग एके दिवशी शाळेतून बोलावणं येतं. मुलांच्या बाबत हळवी असलेली आई रडतच घरी येते. मग शिकवण्या सुरू होतात. पण त्याच्यात काही केल्या सुधारणा होत नाही. एका जागेवर बसून मन लावून अभ्यास काय, कोणतीही गोष्ट करणं अशा मुलाना जमत नाही. एकाच चॅनेलवर कार्टूनसुद्धा ही मुलं बघत नाहीत. एक प्रकारची चंचलता येते आणि तो मग स्वभाव बनतो. मैदानी खेळ न खेळल्यामुळे शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. ही समस्या गंभीर आहेच.
घरोघरी असणार्‍या या समस्येवर उपाय काय? असा प्रश्नही विचारला जातो. त्यावर उपाय नक्कीच आहे. कित्येक घरात टीव्ही सकाळी उठल्या पासून रात्री झोपे पर्यंत चालूच असतो. हे पहील्यांदा बंद केलं पाहीजे. टीव्ही आपल्यासाठी आहे, आपण टीव्हीसाठी नाही. पालकानीच जर टीव्ही बघायच सोडलं नाही तर मग मुलांना आपण कुठल्या तोंडाने सांगणार आणि काय संस्कार करणार? या बाबतीत दोन तक्रारी सतत केल्या जातात. एक शहरात खेळायला मैदाने शिल्लक नाहीत. दोन जे कार्यक्रम टीव्हीवर असतात तेच तर मुलं बघतात. शहरात मैदानं शिल्लक नाहीत हे खरं आहे. पण हात पाय मोकळे करण्यासाठी मुलांनी पहील्यांदा घराबाहेर पडणं आवश्यक आहे. इमारती भोवती असलेल्या मोकळ्या जागेत मुलं सायकल चालवू शकतात. बर्‍याच ठिकाणी कर्‍हाटे, मल्हखांब किंवा तत्सम खेळ शिकवले जातात. अशा ठिकाणी जावून मुलांना त्या खेळाची आवड निर्माण होईलच पण शारीरिक दृष्ट्या ती तंदूरूस्त होतील. दुसरी बाब सद्ध्या टीव्हीवर चांगले कार्यक्रम दाखवले जात नाहीत हा आक्षेप. काही अंशी ते खरंही आहे. पण टीव्हीवर दिसणारी चॅनेल आपला टी.आर्.पी. कसा वाढेल याचाच विचार करतात. मुलांवर चांगले संस्कार कसे होतील याचा नाही. तो विचार आपण पालकांनी करायचा आहे. मुलांनी काय बघावं हे आपण विचारपुर्वक ठरवलं पाहीजे. त्यांच्याबरोबर तो कार्यक्रम आपण बघितला पाहीजे आणि टीव्ही बंद केला पाहीजे. दिवसातून एकदा तरी राष्टीय किंवा सह्याद्री चॅनेलवरच्या बातम्या बघाव्यात. हळूहळू मुलांना ते बघण्याची सवय लागते. पुर्वी आमच्या लहानपणी चांगल्या मालिका असत असं नुसतं न सांगता जर शक्य असेल तर त्या बाजारातून आणून मुलांना दाखवाव्यात. मुलं त्या आनंदाने बघतात. माझ्या मुलीच्या बाबतीत मी असा प्रयत्न केला आहे आणि तो यशश्वीही झाला आहे. चाणक्य, मालगुडी डेज, महाभारत सारख्या मालिका, वीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके सारख्या सिनेमांच्या सीडीज् बाजारात विकत मिळतात. या सारख्या कार्यक्रमांमुळे प्रबोधन तर होईलच पण मग मुलांना चांगल्या कार्यक्रमांची आवडही लागेल. थोडे प्रयत्न केले तर मुलं कार्टूनपासून दूर रहातात हे मी अनूभवातून सांगू शकतो. ‘निक’ या कार्टून दाखवणार्‍या वाहिनीनेच पुढाकार घेतला म्हणजे समस्या किती गंभीर हे लक्षात येतं. आता इतर वाहिन्यांची वाट न बघता आपणच त्या वाहिन्या वरचे कार्यक्रम बघणं बंद करावं हे उत्तम.

No comments: