काळ खुप लवकर बदलतो आहे. तसा तो बदलणारच. आमचा काळ वेगळा होता आणि आजचा वेगळा आहे. जग झपाट्याने बदलत चाललय, असं असलं तरी माणूस जुन्या काळातच जास्त जगत असतो म्हणायचं. आमच्या काळात वडीलांसमोर ब्र काढण्याचीही सोय नव्हती पण आता मुलं आई-वडीलांशी सहज बोलतात. माझ्या एका मित्राच्या मुलीचं लग्न ठरलं आहे. त्या लग्नाचा आनंद असण्यापेक्षा ते कसं पार पडेल याचीच त्या मित्राला काळजी वाटत आहे. बाकी सगळं ठिक ठाक असलं तरी लग्नासाठी होणारा खर्च हा मुख्य विषय आहे. आपल्या भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढून तो हे कार्य पार पाडणार म्हणतो, तेव्हा मुलगी विचारते की तुम्ही आयुष्यभर एकाच नोकरीत टिकून राहिलात. काय कमवलं तिथे राहून?
माझा हा मित्र कर्नाटकातल्या आपल्या गावातून मुंबईत आला. सोबत आजारी आई-वडील. वडील लवकर देवाघरी गेले म्हणून याला आपलं भविष्य घडवण्याच्या काळातच लग्न करावं लागलं कारण घरात आजारी आई होती. मिळालेली नोकरी टिकऊन आणि ती इनामे इतबारे करून त्याने आपला संसार सांभाळला. त्याची एकमेव मुलगी शिकली, आय टी मध्ये नोकरीला लागली, आय टी वाल्यांची तर्हाच वेगळी, नोकरी बदलण्याचं त्यांना काहीच वाटत नाही. वाटायला पण नको. आताच्या काळाप्रमाणे ते बरोबरही असेल, पण आपण तसं करतो म्हणून आपल्या वडीलानीही तसंच केलं पाहिजे होतं असं कसं होऊ शकतं? प्रामाणिकपणे नोकरी करून त्याने आपला संसार केला, मुलीला मोठी केली आता तो आपल्या ताकतीप्रमाणे तिचं लग्न करू पाहतोय, तेव्हा त्याला काय कमावलं आयुष्यभर? एवढंच? असा प्रश्न विचारला गेला तेव्हा तो बाप दु:खी होतोच ना?
No comments:
Post a Comment