Monday, April 29, 2013

ते एक वडील असतात...

ते एक वडील असतात...

आई प्रेमाची नदी तर, वडील सागर असतात
खारट पाणी असूनसुद्धा ,सर्वाना समावून घेत असतात

घरातल्या सर्वांवर त्यांची, करडी नजर असते
मुले घरी वेळेवर नसली तर, गच्चीतच त्याची मूर्ती उभी असते

पोरांनी खूप मोठे झालेले पाहणे, हे त्याचे स्वप्न असते
त्यासाठी घरदार सोडून पळण, त्याच्या जिवालाच माहिती असते

नसेल प्रेम दाखवत तरी ,आतून वाहता झरा असतात
पोर जेवली का विचारल्याशिवाय ,ते ताटाला हात लावत नसतात

शाळा कॉलेज च्या प्रवेशासाठी, घाम टिपत रांगेत तेच उभ असतात
पैशाची जमवाजमव करत, तुटकी चप्पल पुन्हापुन्हा शिवत असतात

पोरग शाळेत जाऊ लागले कि, त्याला सायकल हवी असते
थोडी वरची पायरी चढल्यावर, त्याला बाइक नवी लागते

वडील आपल अजूनही ,बसच्या मागे पळत असतात
पोर नोकरीला लागल्यावर, आता चार चाकीच घेईन म्हणतात

मुलांची लग्न झाल्यावर, स्वेच्छा निवृत्ती घेईन म्हणतात
मुले नातवंडे परदेशी गेल्यावर रिकाम्या घरात, नोकरीला गेलेलेच बरे म्हणतात

चारचौघात कोडकौतुक करणार, ते एक वडील असतात
आई समईतील ज्योत, तर जळणारी फुलवात वडील असतात

Tuesday, April 23, 2013

माझा बाप

आभाळ पेलून धरण्यासाठी, आभाळाचाच श्‍वास हवा,

बाप नावाच्या पारिजातकाचं, असंच काहीसं जिणं असतं,
ते समजून घेण्यासाठी बापच असणं भाग असतं...

कडकपणाच्या आवरणाखाली, झुळझुळणारं पाणी असतं,

भल्यासाठी लेकरांच्या झगडणारं हाड असतं,
दोन घास कमी खाईल; पण पोरांना गोड देतो,
हट्टासाठी पोरांच्या ओव्हरटाईम तो मारत असतो...

डोक्‍यावरती उन्ह झेलत, सावली तो देत असतो,
दणाणत्या पावसापासून, कुटुंब आपलं जपत असतो,
घर नीट चालण्यासाठी स्वतः बाहेर फिरत असतो,
आईच्या मऊशार तळव्यामागचा, तोच राकट हात असतो...

बाप कधी रडत नाही, बाप कधी खचत नाही,
बाप कधी उतत नाही नि बाप कधी मातत नाही,
पोरं सोडतात घरटं अन्‌ शोधू लागतात क्षितिजं नवी
बाप मात्र धरून बसतो, घरट्याची प्रत्येक काडी...

पोरांच्या यशासोबत त्याचं मन हसत असतं,
अपयश पचवताना, ते आतून रडत असतं,
काही झालं, कितीही झालं, तरी कणा ताठ असतो,
खचलेल्या पोराला तोच तर उभारी देत असतो...

सारी कथा समजायला फार मोठं व्हावं लागतं,
बापाचं मन कठीण फार, चटकन हाती लागत नसतं,
आकाशाहून भव्य अन्‌ सागराची खोली असते
बाप या शब्दाची महतीच मोठी न्यारी असते...

मुलाला सुनेच्या ताब्यात देतानाची एका आईची भावना

आज पासून तू आलीस त्याच्या आयुष्यात ......... त्याला सांभाळून घे,
माझी आठवण नको आणून देऊस .......... एवढ त्याला प्रेम दे

त्याला गोड जास्त आवडत नाही ........... हे लक्षात ठेव,
थंडीत नेहमी आजारी पडतो ......... एक स्वेटर विणून ठेव

कधी कधी खूप रागावतो .......... प्रेमाने विचारले तर रडू लागतो
रागात त्याला गाडी चालवून देऊ नकोस ....... पावसात त्याला भिजू देऊ नकोस

लांब गेलात कुठे तर ..... त्याचा हाथ धरून ठेव,
तुला वेळ नाही दिली तरी ....... त्याच्याशी साथ कायम ठेव

त्याला माझी आठवण आली ...... तर तूच असशील एकमेव,
चुंबन घेऊन त्याला ...... मिठीत सामावून ठेव

आज पासून तू आलीस त्याच्या आयुष्यात ......... त्याला सांभाळून घे,
माझी आठवण नको आणून देऊस .......... एवढ त्याला प्रेम दे